२४ डिसेंबर २०२१

साने गुरूजीस पत्र....

प्रिय,

सानेगुरुजी...

आज तुमचा जन्मदिवस... प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 

होय, वाढदिवसच.... कारण, काही व्यक्तींचे फक्त शरीर थकतात, झिजतात, नव्हे नव्हे तर लयाला जाऊन नष्टही होतात.. अखेरीस संपतात... आणि अशी व्यक्ती जनसामान्यांच्या, लहान मुलांच्या,बालकांच्या, विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी घर करून असतात.. आणि म्हणूनच शरीर संपलेल असूनही विचाराने अन् त्यांच्या कार्याने नेहमी माझ्या सारख्या मुलांच्या मनात जिवंत असतात.. आणि म्हणूनच माझ्यासाठी तुम्ही अजूनही जिवंत आहात... चिरकाल राहाल... म्हणून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


कधी कधी कोणाला तरी आपण वाढदिवसानिमित्त पत्र वगैरे लिहितो. म्हणून आज तुम्हाला पत्र लिहावं वाटलं.  मान्य आहे की, आमच्या आजच्या पिढीमध्ये आजची पत्रे टपालाने नव्हे तर मोबाईलने काही मिनी सेकंदात पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.. आधी पत्राची जेवढी उत्सुकता होती हल्ली ती राहिली नाही.. "वाट पाहण्यात मज्जा आहे." असं मला कोणत्या तरी गुरुजींनी सांगितलं होतं. पण ती वाट पाहण्याची मज्जा आम्ही अनुभवत नाहीये. मात्र एक गोष्ट सांगेन.. आधीच्या पत्रात जो जिव्हाळा, आपुलकी असायची ती अजुनही तशीच आम्ही जपून ठेवलीय.. थोडा फार प्रमाणात बदल होऊ शकतो..


बघा ना... पत्र तुम्हाला लिहितोय आणि दुःख पत्राचं, टपालाचं मांडतोय.. पत्र वाचल्या नंतर तुम्ही मला वेडेच म्हणाल.. पण हा वेडेपणा आपल्यामध्ये जिवंत असायला हवं नाही का ? वेडेपणा नसता तर आज तुम्ही पांडुरंग सदाशिव साने ते साने गुरुजी पर्यंत प्रवास केला नसता हो की नाही ? 

गुरुजी, तुमची बरीचशी पुस्तके वाचल्यानंतर मला खरचं प्रश्न पडतो की, माणसाला खरचं एवढं वेडं होता आलं पाहिजे. मुलांप्रती जिव्हाळा, समाजाप्रती आपुलकी, पर्यावरणाशी बांधिलकी, राष्ट्रभक्तीची उपासना, साहित्याशी भक्ती, जनसामान्यांप्रती प्रेम, आणि आपल्या शिक्षकी पेशाशी असलेली एकरूपता...


गुरुजी, तुमची श्यामची आई पुस्तक वाचताना "शाम पायांना घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस तसच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो” अशी म्हणणारी यशोदा मायेची जागा कधी जिजाबाई म्हणजे माझी माय घेते समजलच नाही.. "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" का आहे ? याची पूर्तता जाणीव तुमच्या श्यामची आई पुस्तक वाचताना जाणवलं. जेवढं तुम्ही तुमच्या मातेवर प्रेम करत होतात अगदी तेवढंच तुम्ही या मातृभूमी वर देखील केलात आणि म्हणूनच बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो, आणि आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान... म्हणत जनसामान्यांचा आवाज झालात..


गुरुजी, एक सांगावस वाटतंय की, 'गुरूजी' या शब्दात मातृत्व होतं लळा होता आपुलकी,माया, प्रेम, जिव्हाळा होता. पण हल्ली गुरुजी या शब्दाची जागा 'शिक्षक' या शब्दाने घेतली. शिक्षकांमधलं मातृत्वाचा झरा हळू हळू आटताना दिसतोय..  पण मी नशीबवान आहे गुरुजी, तुमच्यासारखे माझ्याही आयुष्यामध्ये अनेक गुरुजी भेटलेत.. त्यांनीच मला साने गुरुजी शिकवलेत. दररोज सकाळी शाळेत "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे." या प्रार्थनेचा आता अर्थ समाजतोय.. अन् रूजतोय सुद्धा... आणि म्हणूनच मी तुम्हाला वाचू शकलो, जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकलो.  श्यामची आई पुस्तक वाचेपर्यंत तर साने गुरुजी व्याख्यानमालेत सहभाग घेईपर्यंत, तुमच्या ४२ रात्र वाचून त्यावर परीक्षा दिली प्रथम आलो.. या सर्वांपेक्षा महत्वाचं म्हणजे त्या ४२ रात्रीचे प्रसंग मला जीवन जगताना दीपस्तंभ म्हणून मार्ग दाखवत आहेत. तुम्ही शालेय जीवनामध्ये बालमनावर रुजल्यामुळे मुलांना संस्काराची शिदोरी तिथूनच मिळतेय...  आणि एक चांगला माणूस, चांगला नागरिक घडतोय... यापेक्षा तुम्हाला सुखद गोष्ट कोणती असू शकते हो ना...

अशा सुखद गोष्टीने या पत्राचा शेवट करतोय...

"प्रेमाने जग जिंकता येतं." या आशेने मानवता धर्माच्या रस्त्यावर चालून तुम्ही सांगितल्याप्रमाणे "खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे..!" या दृष्टीने जगण्याचा प्रयत्न करतोय..!

सानेगुरुजी, बाकी तुम्ही जिथे असाल तिथे प्रेमाने रहा..


देवा घरची फुलं समजणाऱ्या मुलांमधील मी एक मुलगा...

धन्यवाद..!


तुमचा विश्वासू

दिनेश राठोड (जिजाईसुत)




7391939846

०५ डिसेंबर २०२१

आयुष्याचा प्रवास...

 आयुष्याचा प्रवास करतांना...


अनेकांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, कितीतरी प्रश्नाने मनात कल्लोळ माजलेला असतो. मनातल्या मनात गुंता वाढत जातो. नकारात्मकतेने मेंदू जड होत जातो. आपले असणारे ही परके भासू लागतात.. कारण त्यावेळी आपल्याला समजून घेणारं कोणीच नसतं... आणि समजून घेणारं कोणी नसणं ही भावना देखील किती दु:खदायी असते ना..!

आयुष्याची संध्याकाळ होते की काय अशी भीती मनात वाटू लागते. कितीतरी भावनांचा गोंधळ मनात दाटून येतात.

पण जीवनाच्या वाटेवर चालत असताना दुःख, वेदना, संवेदना, एकांत....वगैरे वगैरे... हे सारं काही गरजेचं असतं, गरजेचं आहे.. यामुळेच आपण स्वतः चा शोध घेऊ शकतो आणि आपली माणसं या अवतरणचिन्हामध्ये असणारी 'आपली खरी माणसं' ओळखून येतात...


मित्रा, आपल्याला हवं तेव्हा कोणीतरी साथ देईल किंवा सोबत असेलच याची खात्री नाही.. पण ज्या परिस्थीतीतून आपण जात आहोत.. त्या परिस्थतीसोबत आपण एकटे असतो.. आणि हा प्रवास एकट्याचा असतो. तो एकट्यानेच करायचा असतो. या एकटाच्या, एकांताच्या प्रवासात आपणच आपली साथ द्यायची असते.. आयुष्याची संध्याकाळ होत असली तरी ही संध्याकाळ उद्याच्या सूर्योदयाची संकेत देत असते... आपला आयुष्याचा सूर्योदय पहायचं असेल तर सकारात्मकतेने आत्महत्येची हत्या करायला शिकायला हवं...

मान्य आहे रे की, आयुष्याचा प्रवास सोपा नाही.. पण मित्रा अवघड देखील मुळीच नाही... काहीही झालं तरी थांबू नकोस.. चालता चालता पडला असशील तर उठ.. विचार कर.. पळ....धाव...धडपड कर... आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लढ... थांबला असशील तर थोडं थांब आराम कर विचार पुन्हा चालायला सुरुवात कर.. पण या प्रवासाला पूर्णविराम न देता.. हा प्रवास नित्याने चालू ठेव... एक दिवस आपल्याला हवं असणारं स्टेशन नक्की येईल...


आणि शेवटचं एकच सांगतो की,

आपल्या आयुष्याचा प्रवास भविष्यकाळासह, 

भूतकाळ सुंदर असावा असं वाटत असेल तर 

आपला वर्तमानकाळ संघर्षानी भरलेला असायला हवं...


©️®️ दिनेश जवरीलाल राठोड

dineshjrathod1998@gmail.com





१६ ऑक्टोबर २०२१

स्त्रीत्व

 __________________________________

 स्त्रीत्व...


पुरुषा,

नीच, कपट, हलकट

असे शब्द तुझ्या विरुद्ध कवितेत मांडताना,

तुलाही वेदना होत असतील ना..


पुरुषप्रधान... पुरुषप्रधान...

हे शब्दही तुला आता 

नकोसे वाटत असतील..


स्त्रीचं वेदनामय भावविश्व मांडताना,

पुरुषाची पडद्यामागची भूमिका 

निर्जीवच दिसत आलीय...

आज सुद्धा...


जाऊ दे रे... पुरुषा,

पुरुष म्हणजे दगड हे चित्र

कालसारखं आजची तसचं आहे.


वेदनाचं डोंगर मौनामध्ये सामावून घेणं,

गुपचूप कोपऱ्यात एकटं रडणं..

हे सारं काही तू आता बंद कर..

दिसू दे तुझेही अश्रू - दु:खं - वेदना - संवेदना,


पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली,

तुझी ओरबड करणाऱ्या...

तमाम कवी - कवयित्रींना...


कदाचित, मग तेही मांडू शकतील..

तुझ्यात लपलेलं स्त्रीत्व....!


©️®️ दिनेश जवरीलाल राठोड (जिजाईसुत)
        चाळीसगाव (जळगांव)
dineshjrathod1998@gmail.com  



_____________________________________

०८ जुलै २०२१

कविते...


कविते...


कविते...

हल्ली कसं 

सगळं सगळं

बदलत चाललंय..

निसर्ग, पशू, पक्षी, प्राणी, सजीव, निर्जीव.. 


आणि 

माणसं सुद्धा...


कविते....

भीती वाटू लागलीय

माझीच मला..

होऊ नये.. 

प्रवास माझा,

सजिवांकडून निर्जीवांकडे...


कारण,

दगडाला पाझर हल्ली 

फुटत नाही..

प्लास्टिकच्या 

फुलातून सुगंध दरवळत नाही..


©® जिजाईसुत



०३ जून २०२१

खेड्यानं आत्महत्या करू नये...

  ▪️ खेड्यानं आत्महत्या करू नये...

__________________________

शहरीकरणाच्या ओझ्याखाली,
कित्येक खेडी गुदमरताना पाहतोय,
स्वतःचं अस्तित्व संपू नये म्हणून...
शेवटी,
खेड्यानं आत्महत्या करू नये... 
म्हणजे झालं.

खेड्यानं, नव्या ऊर्मीने ऊभं रहायलाच हवं.
नव्या कल्पना सोबत घेऊन...

शहर स्वतःच्या धावपळीतून,
एक निवांत क्षण अनुभवण्यासाठी,
खेड्यात कसं धावत येईल...

यासाठी खेड्यानं स्वतःला 
रोज नव्या ऊर्जेची अनुभूती घेत. 
हवंहवंसं बनलंच पाहिजे....

▪️▪️

©️®️ दिनेश राठोड (जिजाईसुत)
        चाळीसगाव (जळगांव)

_____________________________________