वपूंना पत्र
प्रिय वपु,
खरं तर मेसेज करण्याच्या जमान्यात मी तुला पत्र लिहितोय त्यामुळे तुला हे वेगळं वाटू नये. अभिनयात पात्राला व माणसांच्या नात्यात पत्राला खुप महत्व आहे बघ.. आता नात्याबद्दल मी तुला काहीतरी सांगावे म्हणजे मुंगीने हत्तीशी स्पर्धा करावी अशी गत होईल. मानवीवृत्तीवर, नात्यांवर, स्वभावावर एकंदरीत दररोज जगण्याच्या, धडपडण्याच्या गोष्टींची दुसरी सकारात्मक बाजू मांडणारा तू अवलिया आहेस.. अरे सॉरी हं... आज तुझा वाढदिवस आहे.. मी शुभेच्छा द्यायचं विसरलो आणि आपलं भलतंच काहीतरी बरळतोय...
वपु.... तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपली ओळख तशी मागच्या ४-५ वर्षापासूनची एका मित्राने तू लिहिलेलं 'पार्टनर' हे पुस्तक वाचायला दिलं. आणि त्या पुस्तकाच्या एवढा आहारी गेलो की, प्रत्येक गोष्टीत मी अगदी तुझ्यासारखा विचार करण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि खऱ्या अर्थानं या ब्रेकअप पॅचअपच्या जगात तेव्हापासून तू माझा 'पार्टनर' बनलास. आणि आपला कधी ब्रेकअप होणार नाही बघ.. कारण इथल्या अनेक वाचकांच्या मनामध्ये तुझी जागा तू फिक्स करून घेतलीय. जगण्याचा तंत्र मंत्र कोणाला हवं असेल तर त्याने तुझी पुस्तके वाचावीत. तुझी मुद्दामून वाहवा वाहवा करत नाहीय. कारण, या मातीमध्ये कितीतरी लेखक, कवी, साहित्यिक, विचारवंत होऊन गेले त्यातील खुप कमी आजही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यामधील एक नाव म्हणजे वपु काळे...
'पार्टनर' मध्ये किती लिहिलं आहेस रे... म्हणजे मानवी स्वभावावर, त्याच्या जीवनावर एवढं लिहावं! तुझ्या त्या फिलॉसॉफी जगण्यासाठी अनेकांना प्रेरणा देत आहेत. अगदी मला सुद्धा... आणि ऐक ना... तुझ्या पुस्तकामधला खरा 'पार्टनर' प्रत्येकाला मिळायला हवा. मग जगणं किती सुंदर होऊन जाईल ना... 'वपुर्झा' किती भन्नाट लिहिलं आहेस रे.. एक एक वाक्य अगदी मनातल्या छेडतात. आणि कुठूनही वाचायला सुरुवात केलं तरी हे तर माझ्याचवर लिहिलं आहे असं राहून राहून वाटतं. 'आपण सारे अर्जुन' तर सकारात्मकतेने भरलेला खजिना आहे. जेवढं लुटून न्याल तेवढं कमीच.. आणि जगण्याला दिशादर्शक आहे.
वपु... खरं सांगू का तुझ्यात ना मानवी स्वभावाची संशोधन वृत्ती अफाट आहे रे.. तुझ्याच पुस्तकातील एक उदाहरण बघ...."प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यंत असतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!" हे किती भन्नाट संशोधन आहे रे..
पार्टनर, वपुर्झा, आपण सारे अर्जुन, का रे भुललासी, काही खरं काही खोटं, गुलमोहर, गोष्ट हातातली होती, घर हलवलेली माणसे, तप्तपदी, दोस्त, बाई बायको आणि कॅलेंडर, भुलभुलैया, महोत्सव, मी माणूस शोधतोय, मोडेन पण वाकणार नाही, रंग मनाचे, लोंबकळणारी माणस, वन फॉर द रोड,प्रेममयी, पाणपोई, फॅन्टसी - एक प्रेयसी, माझ माझ्यापाशी?, रंगपंचमी, वपुर्झा, चिअर्स, सांगे वडिलांची कीर्ती, इन्टिमेट, ऐक सखे, कर्मचारी,सखी, स्वर, संवादिनी, हुंकार, मायाबझार, ठिकरी, तू भ्रमत आहासी वाया, हि वाट एकटीची, तप्तपदी, प्लेझर बॉक्स १, कथा कथनाची कथा, दुनिया तुला विसरेल, निमित्त, प्लेझर बॉक्स व माणसं तुझ्या या एवढ्या अफाट व भन्नाट लिखाणाला सलाम..!
शेवटी तूच लिहिलं आहेस की, "ज्या माणसाला विचारांची सोबत आहे, त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही." मग हे अंतर तुझ्या माझ्या मनातलं सुद्धा असू शकतं नाही का? आणि जी माणसं आपल्याला जवळची वाटतात त्यांना आपण प्रेमाने एकेरी उल्लेख करतो. तू मला माझा जवळचा वाटतोस म्हणून पत्रात एकेरी उल्लेख केलाय. आणि नात्याला वयाचं बंधनं नसतात. हे सगळं तूच सांगत आला आहेस. पण वपु एक खंत नेहमी वाटते रे तू अजून काही दिवस जगायला हवा होता रे... आपली एक भेट व्हायला हवी होती. एवढा सुंदर लिहिणारा माणूस प्रत्यक्ष खरचं किती सुंदर असेल.. पण काही स्वप्न स्वप्नंच असतात.
चल आता निरोप घेतो, पुस्तकामध्ये, विचारांमध्ये, भेटत राहूयात..!
तुझा सखा
दिनेश राठोड
लेखक - दिनेश राठोड (जिजाईसुत)
चाळीसगांव (जळगांव)
मो. नं. 7391939846
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा