१४ नोव्हेंबर २०२०

सणवार

 सणवार


मी

भविष्याची चिंता करत

काळजाची चिता करून

हाडाचा सापळा 

असणाऱ्या ह्या शहराच्या

दहा बाय दहाच्या खोलीत

बस्ता ठेवून

बॅचलर सोबत 

खस्ता खात असतो 

उज्ज्वल भवितव्यासाठी..


बॅचलर मुलांना 

सणवारांची नसतेच नवलाई

सण - वार फक्त कॅलेंडरमध्येच दिसतात

पण तरीही फॉर्मलिटी म्हणून..

साजरी करत असतो 

मी दिवाळी


तेव्हा ., 

माझ्या मनातचं बाप दिवा होतो,

अन् आई वात होते

अश्रू तेल होतात.

आणि प्रेरणेचा दिवा पेटत राहतो

स्वतः जळून जगाला प्रकाश देण्यासाठी


विचारांचे फटाके 

मनातंच फुटत राहतात

नवे कपडे, नवीन वस्तू, गोडधोड

हे सारं काही 

रातस्वप्नंच राहतात

कदाचित तो शापही असावा

बॅचलर मुलांसाठी...


ध्येयाच्या जवळ 

अन् आई बाबांपासून दूर राहून

कित्येकदा दिवाळी

अशीच साजरी होते माझी 

म्हणूनच...

म्हणूनच म्हणतोय

बॅचलर 'मुलांना' सणवारांची

नसतेच नवलाई....!


©® जिजाईसुत

______________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: