१८ मे २०१९

मी भारतीयच..!

मी फक्त भारतीयच..!

माझी कोणतीच ओळख,
जगासमोर मांडू नका.
उगाच कोणत्याही जातीत,
धर्मात मज ओढू नका.

धर्मात माणुसकी कधीची वाहून गेली
ओसाड पडलाय माणुसकीचा मळा.
आजही हल्ली जातीच्या नावाखाली,
कापला जातोय अनेक निष्पापांचा गळा.

आज माणसे - माणसे ही विसरलीत,
आपापल्या जाती धर्माच्या कारणांनी.
रंग, मूर्ती,महापुरुष वाटून घेतलीत,
इथल्याच कट्टर जातिवंत माणसांनी.

आता जाती निहाय जनगणना होते,
मोजल्या जातात जातीनिहाय संख्या,
माणुसकीनिहाय जनगणना कधी होईल का?
मोजल्या जातील का माणुसकीनिहाय संख्या!

हिंदू,मुस्लिम,बौध्द,सिख,ईसाई,
असतील अनेक धर्म वा जाती.
सर्वांहून आजही श्रेष्ठच आहे रे
माणसा..! माणुसकीची नाती.

हे असं असंच कुठपर्यंत,
आपण चालूच ठेवणार.
मी फक्त भारतीयच आहे.
असं आपण कधी म्हणणार?

©️®️ दिनेश राठोड (जिजाईसुत)
        चाळीसगाव (जळगांव)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: