१८ मे २०१९

मी भारतीयच..!

मी फक्त भारतीयच..!

माझी कोणतीच ओळख,
जगासमोर मांडू नका.
उगाच कोणत्याही जातीत,
धर्मात मज ओढू नका.

धर्मात माणुसकी कधीची वाहून गेली
ओसाड पडलाय माणुसकीचा मळा.
आजही हल्ली जातीच्या नावाखाली,
कापला जातोय अनेक निष्पापांचा गळा.

आज माणसे - माणसे ही विसरलीत,
आपापल्या जाती धर्माच्या कारणांनी.
रंग, मूर्ती,महापुरुष वाटून घेतलीत,
इथल्याच कट्टर जातिवंत माणसांनी.

आता जाती निहाय जनगणना होते,
मोजल्या जातात जातीनिहाय संख्या,
माणुसकीनिहाय जनगणना कधी होईल का?
मोजल्या जातील का माणुसकीनिहाय संख्या!

हिंदू,मुस्लिम,बौध्द,सिख,ईसाई,
असतील अनेक धर्म वा जाती.
सर्वांहून आजही श्रेष्ठच आहे रे
माणसा..! माणुसकीची नाती.

हे असं असंच कुठपर्यंत,
आपण चालूच ठेवणार.
मी फक्त भारतीयच आहे.
असं आपण कधी म्हणणार?

©️®️ दिनेश राठोड (जिजाईसुत)
        चाळीसगाव (जळगांव)

११ मे २०१९

लोकनाट्य तमाशा काल, आज आणि उद्या..!"

गेल्या अनेक दशकापासून लोकनाट्य तमाशा चालत आलेला आहे. त्याचा इतिहासही खूप मोठा आहे. समाज जीवनाचं दर्शन, वास्तविकता लोककला, तमाशातून घडत असतो. लोकांचं मनोरंजन करणे हा मूळ उद्देश तमाशाचा असतो.
गायन वादन नृत्य आणि विनोद यांचा संगम आपल्याला तमाशातून दिसून येतो.
अशा या लोकनाट्य आविष्काराचा कालची परिस्थिती, आजची वास्तविकता आणि भविष्याची वाटचाल मांडण्याचा छोटासा प्रयत्न...

"तमाशा" या शब्दाची निर्मिती अरबी भाषेतून झालेला आहे. तमाशा म्हणजे दृश्य, खेळ अथवा नाट्य प्रयोग असा होतो..
तमाशाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात..
१. ढोलकीचा तमाशा २. संगीत तमाशा
हे दोन प्रकार पडत असले तरी, खानदेशी तमाशा,
कोल्हाटणीचा तमाशा, वायदेशी तमाशा, खडी गंमत असे हे उपप्रकार पडतात.

तमाशाचा प्रयोग गावोगावी भरणाऱ्या जत्रांत, उघड्यावर किंवा तंबूत होत असतो.
तमाशाची मांडणी अथवा सादरीकरण क्रम सगळ्यांची सारखीच असते. सर्वात आधी गण होतात यात श्रीगणेशाला साकडे घालतात.

आधी गणाला रणी आणा l
नाही तर रंग पुन्हा सुना- सुना ll ध्रु ll
त्यानंतर गवळण होते ती अशी,
‘थाट करूनी माठ भरूनी
घ्या गं सगळय़ा शिरी,
माठ गोरसाचे शिरी,
आडवा आला तू गिरीधारी
सोड रस्ता हरी,
जाऊ दे बाजारी...!

गवळण संपली की मग बतावणी, लावणी, सावलाजवाब, आणि मग नंतर सुरू होते रंगबाजी (हल्लीच्या पिढीचा आवडता प्रकार)
त्यानंतर तमाशाचा शेवटचा टप्पा म्हणजे वग (हल्लीच्या पिढीला नकोसा वाटणारा प्रकार)
अशी अनुक्रमे सादरीकरण करतात..

तमाशाची कालची परिस्थिती :-

तमाशाकडे मागे वळून पाहताना आपल्याला काळू-बाळू, पठ्ठे बापुराव, राम जोशी, यांची आठवण होते...आपण काही दिवस मागे वळून पाहिले तर तमाशात मुख्य प्रकार मानला जायचा तो म्हणजे वग.
वग म्हणजे नाट्यरूपाने सादर केलेली कथा. या कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा असतात. यात समाजातील घडणाऱ्या घटना, प्रसंगानुरूप वग असायचं.. काळू बाळू यांची जिवंत हाडाचा सैतान, कोर्टात मला नेवू नका ही त्याकाळी गाजलेली वग.
प्रेक्षक आपले माय बाप आहे. याच उद्देशाने तमाशा कलावंत आपली कला सादर करायचे..
एक प्रसंग नमूद करावासा वाटतो..

१९९१ सालच्या नांदेड जिल्हयातील मालेगावच्या यात्रेतला एक प्रसंग. रघुवीर खेडकर यांचा तंबू यात्रेत लागला होता आणि राजीव गांधी हत्या प्रसंगावर वग सादर होणार होता. त्यासाठी एक हेलिकॉप्टर बनविण्यात आले होते आणि फटाक्यांची दारू आणि सुतळी बॉम्ब तयार ठेवण्यात आले होते. वामन लोहगावकर हा सोंगाडया आणि रघुवीर खेडकर यांचा मुलगा व भाचे मंडळी राजीव गांधींच्या स्वागताला तयार होती. असा प्रसंग त्या वगात दाखविण्यात आला होता.
आपटाबारच्या पेटीचे झाकण आदळल्याने मोठा स्फोट झाला. रघुवीरचा ५,६ वर्षाचा भाचा बबलू जबरदस्त भाजला तर वामनमामांच्या डोक्याचा एक भाग अक्षरश: फुटून बाजूला पटला. वामनमामा जागीच ठार, तर बबलू जबर जखमी.
हिंमतवान कांताबाई सातारकर , नातू बबलूला घेवून एकटया नांदेडला दवाखान्यात रवाना झाल्या. प्रेक्षकात गोंधळ उडाला. परंतु हे दु:ख बाजूला ठेवून वामनमामाचे प्रेत एका कपडयात झाकून ठेवलं व तमाशा पुन्हा सुरू झाला. रघुवीर खेडकर मधला जातीवंत सोंगाडया प्रेक्षकांना खळाळून हसवित होता. त्यावेळी रघुवीर नावाच्या सोंगाडयाच्या अंत:करणात काय वेदना होत्या याची कल्पना कुणीच करू शकणार नाही.

"तुमच्या वेदनांची फुलपाखरं झाली । 
माझ्या फुलपाखराला वेदना होताहेत ll"

असे कलाकार, असे प्रेक्षक, होते म्हणून त्याकाळी तमाशा जिवंत वाटायचा..

तमाशाची आजची वास्तविकता :-

आजच्या दशेला तमाशा मध्ये जिवंतपणा आपल्याला दिसत नाही.आणि प्रेक्षक ही माणसासम राहिले नाहीत. हे कडू पण सत्य आहे. हल्लीच्या पिढीला तमाशा मध्ये गण, गवळण, लावणी, वग हे नकोसे वाटतात. फक्त आणि फक्त रंगबाजी चालते. चित्रपटाचा परिणाम असावा कदाचित.. चित्रपटात जे पाहतात तेच जिवंतपणा त्यांना तमाशात हवा असतो.. त्यामुळे रंगबाजी हे हल्लींच्या पिढीचा आवडता प्रकार आपण म्हणू शकतो..
आज लोकांच्या नजरा हे गोऱ्या पान मांडीवर अन् नक्षीदार पाठीवर जातात.आणि म्हणूनच तमाशा कलाकार हे लोकांच्या मागणी नुसार पुरवठा करताना आपण पाहतच आहोत. यामुळे त्यांच्यातला खरा कलाकार आज जिवंत असूनही मरत चाललाय.आज अनेकदा अनेक गैरप्रकार ही घडत आहेत.. तमाशाचा प्रयोग चालू असताना दगड फेक होते यामुळे कलाकाराना दुखापत ही होते..
आज तमाशातील कलाकारांना पाहण्याची लोकांची मानसिकता बदललेली आहे.
आज समाजातील काही तरुण युवा घटक आपल्या गावात तमाशा कोणीच आणू नये अथवा तमाशा चा प्रयोग आपल्या गावात होऊ नये असं त्यांना वाटायला लागली आहेत आणि त्यामुळे तमाशा कलाकारांसाठी ही खूप भयावह परिस्थिती निर्माण होत आहे.

भविष्याची वाटचाल :-

वरील आजची परिस्थिती चा विचार केला असता.
लोकांचं मनोरंजन करणारा "तमाशा" हा लोककला प्रकार निरंतर चालू राहील का ? हा ही खूप गहन प्रश्न आहे..
हल्ली मनोरंजनाची अनेक साधने निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून मनोरंजनात्मक गोष्टी निर्माण होत आहे..
तमाशा बद्दल ची लोकांची मानसिकता, समज गैरसमज, यांचा विचार केला असता.तमाशा हा प्रकार लोप पावेल की काय असे आपल्या दिसून येतं.. आज शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. तमाशातील कलाकारांनी त्याच्या भविष्यातील मुलांबाळांसाठी ही गरज महत्वाची नाहीय का.?
की तेही आपलाच वारसा पुढे चालवत ठेवणार आहे.. हा वारसा पुढे चालवत ठेवण्यासाठी त्यांनी सद्य आणि भविष्यातील परिस्थितीचा ही विचार जरूर करावा. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तमाशा हा कलाप्रकार आपली भूमिका नेहमीप्रमणेच प्रखड ठेवेल का ? सर्व बाजूनी उपेक्षितांचे जगणे जगणाऱ्या या कलाकारांची शासकीय आणि माणुसकीच्या आश्रयासाठी चाललेली धडपड पाहून मन हेलावून जाते. महाराष्ट्राची ही अभिजात कला जर जोपासली नाही तर भविष्यात 'एक होता तमाशा' असं म्हणण्याची वेळ येईल. म्हणून महाराष्ट्राच्या या कलाप्रकाराला पूर्वीसारखा राजाश्रय (शासकीय) आणि लोकाश्रय मिळणे ही काळाची गरज आहे नाही तर ही लोककला अस्तंगत होवून फक्त इतिहासातील एक वाचनीय पान होवून राहील.
यातही तमाशा कलाकारांनी त्याची तमाशा कलाकारी अस्तित्व टिकवून ठेवेल का ? हा ही जिवंत प्रश्न मनात उभा राहतो...

लेखक: दिनेश जवरीलाल राठोड
चाळीसगाव जि. जळगांव
मो. नं.9359360393