१४ फेब्रुवारी २०२४

द केकी मूस

 द केकी मूस


आज व्हॅलेंटाईन डे आजवर आपण अनेक प्रेमकहाण्या ऐकल्या असतील वाचल्या असतील... मात्र आज एक कहाणी सांगणार आहे. ज्यात असीम त्याग आणि तितकीच आजन्म ओढ आपल्याला दिसेल...


हि कथा आहे केकी मूस नावाच्या एका अवलिया कलाकाराची. आणि आयुष्याच्या अंतापर्यंत जपलेल्या प्रेमळ धाग्याची !


आधी त्यांचा रूढ अर्थाने परिचय सांगतो. 

कैकुश्रू माणेकजी उर्फ केकी मूस (जन्मः २ ऑक्टोबर, इ.स. १९१२ - मृत्यू: ३१ डिसेंबर, इ.स. १९८९)

मुंबईत जन्मलेले व पुर्व खान्देशातील चाळीसगांव येथे राहिलेले ते एक जागतिक कीर्तीचे चित्रकार व छायाचित्रकार होते.

त्यांची "टेबल टॉप फोटोग्राफी" जगप्रसिद्ध आहे. स्थिरचित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक्ड फोटोग्राफी अशा विविध प्रकारात केकीने कामे केली. त्याच्या टेबलटॉप फोटोग्राफीच्या प्रकारातील छायाचित्रांना तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली.मराठी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, गुजराती, उर्दू या भाषा त्याला अवगत होत्या. व्हिन्सेंट व्हँगाँगचं चरित्र केकी मूस याने मराठीत अनुवादित केले होते. 

हि झाली औपचारिक ओळख. तर त्यांच्यातील कलाकाराबद्दल आधी सांगतो. त्यांच्या इतकी टेबल टॉप फोटोग्राफी त्या काळात जगभरात कुणी इतक्या ताकदीने करत नव्हते. जगात अव्वल नम्बरवर मूस होते. टेबल टॉप फोटोग्राफी म्हणजे स्टुडिओत बसून टेबलावर अशी काही रचना ते करायचे आणि मग फोटो काढायचे की ते जणू अस्सल निसर्गात जाऊन काढलेले छायाचित्र आहे असे वाटावे. "हिमलयाज" नावाची त्यांनी अशीच एक कलाकृती जगभर गाजली. त्यात हुबेहूब हिमालय त्यांनी कॅमेऱ्यात पकडल्याचा भास व्हावा. प्रत्यक्षात त्यांनी टेबलवर खडेमीठ अशा रीतीने पसरून त्यावर योग्य ती लाइटिंग केली होती की अस्सल हिमालय वाटावा. 

असे अनेक चकित करणारे प्रयोग त्यांनी केले. मात्र जगभर गाजला गेलेला हा कलाकार आयुष्यात कधीच स्वतःच्या घराच्या बाहेर पडला नाही. पूर्ण आयुष्य एकाच ठिकाणी स्टुडिओत व्यतीत केलं. एकदा पंडित नेहरू यांना त्यांच्याकडून स्वतःचे पोर्ट्रेट फोटो काढून घेण्याची इच्छा झाली. त्यासाठी मूस याना दिल्लीला निमंत्रण दिले गेले. मात्र मूस यांनी नम्रपणे नकार दिला पण सोबत निरोप पाठवला की, तुमचे पोर्ट्रेट मी तयार ठेवतो. पुढच्या महिन्यात माणूस पाठवा. तिकडे नेहरू चकित. कारण समोर मी नसताना देखील मूस माझा फोटो कसा काढणार?

महिन्याने तो फोटो तयार झाला आणि दिल्लीत पोचला. त्या फोटोला त्या वर्षीचे जागतिक दर्जाचे अवॉर्ड मिळाले. काय जादू केली मूस ने? 

तर काहीच नाही. एका लाकडी खुर्चीवर त्यांनी पृथ्वीचा ग्लोब (गोळा) ठेवला आणि त्याला नेहरू वापरतात तशी पांढरी टोपी ठेवली. आणि फोटो काढला. जगभर शांततेचा प्रसार करणारे नेहरू (शांतिदूत) असा नेमका अर्थ त्यातून लोकांना कळला.

असे होते केकी मूस. 

त्यांचे एकच स्वप्न होते की लंडन मध्ये जाऊन कलेच्या क्षेत्रातील उच्च शिक्षण घ्यावे. मात्र घरच्या गरिबीमुळे त्यांना ते जमत नव्हते. केकींच्या मनातील घालमेल आईला कळली बहुधा, आई एक दिवस त्यांना म्हणाली, “केकी, बाळा, मी तुला उद्या पैसे देणार आहे, तू लंडनला जाण्याची तयारी कर!”. केकींनी १९३५ ला लंडनला प्रयाण केले व चार वर्षांत त्यांचा ‘कमर्शियल आर्ट’चा डिप्लोमा पूर्ण केला. ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ने फोटोग्राफीच्या जागतिक दर्ज्याच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षांत घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला, अन् ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले. केकी १९३९ च्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या हप्त्यात भारतभूमीवर उतरले. ते दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्षें, त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला स्वेच्छेने आत्मकैद केले. नंतर ते कधीही त्यांच्या घराबाहेर पडले नाहीत.


        आता त्यांच्या असीम प्रेमाची कहाणी सांगतो. लंडनमध्ये असताना त्यांना तिथली एक मुलगी प्रचंड आवडली. तिलाही हे आवडले. तिथल्या काळात प्रेम फुलले. मात्र केकी भारतात यायला निघताना तिचे अजून १ वर्ष शिक्षणाचे बाकी होते. ते पूर्ण करून मी येते तोवर तू पुढे जा, असे तिचे मत मान्य करून केकी भारतात परतले. तिच्याकडून नियमितपणे तिकडून पत्र यायची. केकी मात्र ती पत्रे कधीच फोडून वाचत नसत. एका कपाटात व्यवस्थित एकावर एक ते ठेवून देत असत. तिच्या पत्राला यांनी कधी उत्तर पण पाठवले नाही. हे असे का ? यावर त्यांनीच एकदा सहकारी मित्राला सांगितले की, "त्या पत्रात काय असणार मला माहित होते. की अजून तरी इतक्यात मी येऊ शकत नाहीय, समजून घे. पण मी नक्की येणार आहे. हेच असणार न ? नाहीतर ती थेट येईल न? पत्र कशाला पाठवेल? आणि माझ्या डेस्टिनीमध्ये ती असेल तर येईल. नसेलच तर नाय येणार" असा साधा सरळ विचार ते करत. 

हा पत्राचा तिकडून येण्याचा वेग नंतर नंतर कमी झाला. तरीही सुमारे २५ वर्षे पत्र येत होती. त्यांनी तिला आधीच सांगून ठेवलं होत की, अमुक एक ट्रेन मुंबईवरून चाळीसगाव ला येते. ती चाळीसगावला संध्याकाळी चार वाजता पोचते. त्यावेळी तू येशील. हि खात्री आहे. 

रोज ठरल्यासारखे चार वाजता स्टेशनच्या दिशेकडे असणाऱ्या रस्त्याकडे डोळे लावून दहा मिनिट ते बसत आणि नंतर शांतपणे आपल्या कामाला लागत. कसला वाद नाही कसली हमरीतुमरी नाही. ती तिकडे अडचणीत असेल म्हणून आली नसेल. हा इतका सरळ साधा विचार ते करत राहिले. दुतर्फी प्रेम असूनही कसलीही बळजबरी, आग्रह न करता केवळ संयमाने वाट पाहण्याची हि असीम ताकद त्यांच्यात कुठून आली असेल?

आजही "ती" कोण होती ? हे अज्ञात आहे. पण काही काही गोष्टी अज्ञात असलेल्याच चांगल्या असतात न. 

गोडी अपूर्णतेची लावील वेड जिवा! 

असं मात्र यावेळी वाटत. 

        केकींना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती. म्हणूनच त्यांनी शहरातून प्लायवूड, फेविकॉल, बारीक चुना, सनमाईका मागवला. त्यांच्या सान्निध्यातील नेहमीचे सेवेकरी आणि ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’चे सदस्य यांनी केकींना या आणलेल्या साहित्याबाबत विचारणा केली. तेव्हा केकी गंभीर होत धीरोदात्तपणे उत्तर दिले, की “तुमी लोक बी ना बस... आरे! आपलेला आज ना उद्या जग छोडाचा नाही का! मी तर ज्यानार, बाबा! माझे काम मी खतम केला, बघ. आता तेची बुलाव्याची वाट बघतो, म्हणून कोणाला बी तरास नको. माज्या कफन मीच बनवून ठेवते!”. बाबुजींची हिंमत आणि उद्गार ऐकून तिघांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अवघ्या पंधरा दिवसांनी, ३१ डिसेंबर १९८९ रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास केकीना त्या कफनचा आधार घ्यावा लागला.


सलाम करण्याच्या पलीकडे काही माणसे असतात, त्यातील एक म्हणजे केकी मूस !

- दिनेश राठोड