१३ मार्च २०१९

वर्तुळ

       वर्तुळ

गुरुजी, मुलांना वर्तुळ समजावून सांगताना,
अनेक वेगवेगळे दाखले दिले.
तरी मुलांना वर्तुळ काही समजेना.
गुरुजी वेगवेगळे अध्ययन अनुभव देऊ लागले.
अखेर गुरुजींना युक्ती सुचली, अन् म्हणाले-
पोरांनो,आपली माय भाकरी बनवते ना!
त्या भाकरीचा आकार जो असतो ना !
त्या आकाराला "वर्तुळ" म्हणतात.

तेवढ्यातच फाटलेली चड्डी, ठिगळ लावलेल शर्ट,मळलेले कपडे घातलेला....
किसन्या ढसा- ढसा रडायला लागला.
गुरुजी म्हणाले- किसन्या उभा रहा का रडतोस?

किसन्या म्हणाला- गुरुजी, चार दिसांपासून पोटात भाकरी नाय.
आज वर्तुळामुळे मले भाकरीनी याद आयी.
गुरुजी, कोणास सूर्य,चंद्र,तारे,प्रिय वाटले,
तर कोणास रंभा,अप्सरा,उर्वशी...
पण गुरुजी....
मयां मायबापनं अख्खं आयुष्य...
भाकरीवराचा चंद्र शोधण्यातच निघालं.
त्यांना भाकरी कधीच आपली वाटली नाय.

गुरुजी,गरीबी हटावचा नारा तेव्हाही होता,
अन् आज आत्ता ही तसचं हाय.
गिधड्यासारखं अख्खं आयुष्य निघून गेलं.
पण गुरुजी, जिंदगीचा टाहो आजही तसचं हाय..

©️ कवी: दिनेश राठोड (जिजाईसुत)
   चाळीसगाव (जळगांव)